रोटरी मुव्हमेंटतर्फे कोल्हापुरात 125 बेडचे कोविड सेंटर सुरु; रोटरी व क्रिडाईतर्फे सामाजिक कार्याचा अनोखा सेतूबंध
schedule02 Aug 20 person by visibility 445 categoryउद्योग
कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयामध्ये बेड्सची कमतरता पाहून रोटरी मुव्हमेंट ऑफ कोल्हापूरच्या 2019-20 बॅच मधील 12 रोटरी क्लबनी एकत्र येऊन महानगरपालिका प्रशासनाला सर्वसोयींनी सज्ज असे 538 बेड देण्याचा भव्य उपक्रम हाती घेतला होता. त्यातील 120 बेड महासैनिक दरबार हॉल येथील कोविड सेंटरला आज देण्यात आले.
रोटरी इंटरनॅशनलच्या सहाय्याने ग्लोबल ग्रांट मार्फत एकूण 62 लाख रुपये किमतीचे बेड व उपकरणे देण्यासाठी तत्कालीन प्रांतपाल डॉ. गिरीश मसुरकर, प्रांतपाल रो. संग्राम पाटील, रोटरी मुव्हमेंट 2019-20 चे अध्यक्ष रो. सूर्यकांत पाटील (बुदिहाळकर), सचिव रो. गिरीश जोशी, खजानीस रो. प्रवीण कुंभोजकर, रो. ऋषिकेश केसकर यांनी परिश्रम घेतले. या 538 बेड पैकी 120 बेड महासैनिक हॉल येथील कोविड सेंटरला देण्यात आले असून यापैकी 100 रेग्युलर बेड व 20 फाऊलर बेड आहेत. गादी, चादर, बेडशीट असा संपूर्ण सेट सोबतच रुग्णांची सोय व्हावी यासाठी 5 स्ट्रेचर व 5 व्हीलचेअर सुध्दा येथे देण्यात आले आहेत.
या कोविड सेंटरमधील संपूर्ण हॉल बंदिस्त करणे, 10 बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देणे यासह इतर सर्व पायाभूत सुविधा या क्रिडाईच्या कोल्हापूर शाखेमार्फत पुरवण्यात आल्या आहेत. क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, महाराष्ट्र क्रीडाईचे अध्यक्ष राजीव परीख, कोल्हापूर क्रिडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव रवीकिशोर माने, सचिन ओसवाल, सहसचिव प्रदीप भारमल हे सर्व पदाधिकाऱ्यांसह या सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत आहेत.
आपत्ती कोणतीही असो, रोटरी या जगातील सर्वात मोठ्या समाजसेवी संघटनेने नेहमीच कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. रोटरी इंटरनॅशनलच्या दि रोटरी फाउंडेशनच्या मदतीने प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपयांची मदत विविध उपक्रमांसाठी केली जाते. सध्या कोरोना रुग्णांना बेड मिळणे दुरापस्त झाले असताना महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत रोटरी व क्रीडाई तर्फे महासैनिक दरबार हॉल येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी मोलाची मदत करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप होत असताना रोटरीने क्रीडाई सोबत हात मिळवून रुग्णांसाठी हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे असे मनोगत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले. रोटरी तर्फे उर्वरित 418 बेड लवकरच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल मध्ये आयुक्त आणि जिल्हा प्रशासन यांचे सूचनेनुसार पुरविली जातील.
या 538 बेडमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची चांगली सोय होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होईपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहू असे आश्वासन रोटरी मुव्हमेंट ऑफ कोल्हापूरचे सूर्यकांत पाटील (बुदिहाळकर) व क्रीडाईचे विद्यानंद बेडेकर यांच्यामार्फत देण्यात आले.
याप्रसंगी रोटरीचे 2019-20 सालचे सहाय्यक प्रांतपाल रो. प्रकाश जगदाळे, रो. सिद्राम पाटील, रो. एम. वाय. पाटील यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते.