Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

‘कागल’मध्ये परिवर्तनाचा आवाज झाला बुलंद; मुश्रीफ, पी. एन, कोरे, कुपेकर, आवाडेंचं काय होणार ?

schedule24 May 19 person by visibility 5364 categoryराजकारण

कोल्हापूरप्रतिनिधी द फायर : 

कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघांनी इतिहास घडवला आहे. विद्यमान दोन्ही खासदारांना जनतेनं सक्तीची विश्रांती दिली आहे. शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिक व  धैर्यशील माने यांनी मोठ्या फरकानं विजय मिळविला. कोल्हापूर मतदार संघात तर सुत्नामी आली. त्यात दिग्गज विरोधकांचे बालेकिल्ले साफ उधवस्त झाले. या लाटेनं प्रा. संजय मंडलिकांना पावणेतीन लाखांचं विक्रमी लीड दिलं. या सुत्नामीनं जिल्यातील दिग्गज विरोधकांच्या राजकीय भवितव्याविषयी भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. विशेषतः हसन मुश्रीफ (कागल), पी. एन. पाटील (करविर), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), विनय कोरे (शाहुवाडी), श्रीमती संध्यादेवी कुपेकर (चंदगड) आदींच्या पायाखालची वाळू घसरली असावी. प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना मिळालेलं मताधिक्य धडकी भरवणार आहे.विशेषत: सेना-भाजपचे तगडे विरोधक रिंगणात असताना जागा राखण्याचं तसंच पुन्हा मिळविण्याचं मोठं अवघड आव्हान या दिग्गजांपुढं असेल.

 

कागलमध्ये शाहू समूहाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी पायाला भिंगरी लावली आहे. दिवस-रात्र एकच एक विधानसभेचा ध्यास घेतला आहे. परिवर्तनाचा आवाज दिला आहे. कागल विधानसभा क्षेत्रात प्रा. संजय मंडलिक यांना ७१ हजारांचं प्रचंड मोठं लीड मिळालं आहे. त्यांना हे लीड मिळवून देण्यात समरजीतसिंह घाटगे यांचा सिंहाचा वाटा आहे, हे मान्यचं करावं लागेल. समरजीतसिंहराजेच्या परिवर्तनाचा आवाज कमालीचा बुलंद झाला आहे. त्यांचं आव्हानं मुश्रीफापुढं असेल. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मुश्रीफांचे सर्व विरोधक समरजीतसिंहराजेच्या पाठीशी पूर्ण ताकतीनं उभे राहतील. त्यांचं आव्हानं मुश्रीफापुढं असेल. कोल्हापूर मतदारसंघात ‘एमएम’ विरोधात लाट होती. तशीच परिस्थिती कागलमध्ये ‘एचएम’ यांची करण्याचा झाडून सगळ्या मुश्रीफ विरोधकांचा प्रयत्न राहील. प्रा. मंडलिकांनाही जनतेच्या प्रवाहाविरुद्ध जाता येणार नाही.  

करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी लोकसभेच्या प्रचारात झोकून देत काम केलं. करवीरमध्ये प्रा. संजय मंडलिक यांना ३६ हजार ८३३ मतांचं लक्षणीय लीड मिळालं आहे. इथं पी. एन. पाटील राजकीय आयुष्यातील अखेरची लढाई लढणार आहेत. प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेलं मोठं लीड चंद्रदीप नरकेंची जागा सुरक्षित करून गेलं आहे. तीच परिस्थिति राधनगरी-भुदरगडमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांची आहे. त्यांच्या विरोधात के. पी. पाटील, ए.वाय.पाटील, सत्यजित जाधव, राहुल देसाई आदीसह डझनभर नेते लढण्यास इच्छुक आहेत. या मतदार संघात प्रा. संजय मंडलिक यांना ३९ हजार ९३७ मतांची आघाडी मिळाली. हे लीड तोडणं विरोधकांच्या दृष्टीनं फार अवघड गोष्ट आहे.

 

चंदगड मतदार संघात तर मंडलिकांना जवळजवळ ५१ हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. इथंही शिवसेना-भाजप युतीत इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. आधी ही जागा कुणाला सोडायची यावरूनच दोन मित्रपक्षांत तणातणी होणार आहे. त्यानंतर उमेदवार ठरेल. पण राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांना पुढे चाल दिली तरी त्यांची वाट मोठी बिकटच असेल.

 

उत्तरमध्ये शिवसेना उमेदवाराला सर्वात कमी म्हणजे २७ हजार ७८३ मतांचं लीड मिळालं आहे. तुलनेनं हे लीड कमी वाटतं. पण या मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हॅटट्रीकच्या तयारीत आहेत. ‘तू फक्त लढ म्हण’ असं आवाहन करत त्यांनी आपला किल्ला अधिकच मजबूत केला आहे. गेल्यावेळचे त्यांचे प्रमुख स्पर्धक म्हणजे काँग्रेसचे सत्यजित कदम आता पक्षाच्या शोधात आहेत, तर दुसरे विरोधक भाजपचे महेश जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी क्षीरसागरांचं काम करणार नाही, असं जाहीर केलं आहे. मात्र, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. तिथं राजेश क्षीरसागरांना डावलणं एवढं सोपं नाही.

 

‘दक्षिण’चं विधानसभेत प्रतिनिधित्व भाजपचे अमल महाडिक करतात. लोकसभेच्या निवडणुकीत ते धर्मसंकटात होते. चुलत भाऊ धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या तिकीटावर पुन्हा जनतेचा कौल मागत होते. अमल यांच्या सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या विरोधातील काटाजोड लढतीत धनंजय यांनी पक्षनिष्ठा आणि आघाडी धर्मही बाजूला ठेऊन निर्णायक मदत केली होती. बंटी पाटील यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला भाजपच्या तिकीटावर अमल महाडिक यांनी धक्कादायकरित्या पराभूत केलं. त्यात राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या धनंजय महाडिक यांची निर्णायक भूमिका होती. साहजिकतच अमल महाडिक यांनी या लोकसभा निवडणुकीत जाहीरपणे कोणतीही भूमिका घेतली नाही. असा आरोप आहे की, युती धर्म खुंटीला टांगत अमल महाडिक यांनी पडद्याआडून चुलत भावाला मदत केली. तरीही या मतदारसंघात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना ४३ हजार १५६ मतांची मोठी आघाडी घेतली. यात ‘आमचं ठरलंय’ फेम काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य बंटी पाटील यांचा निर्णायक वाटा आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत बंटी पाटील काँग्रेसतर्फे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. अमल महाडिक यांना बदलत्या परिस्थितीत आपली जागा राखणं खूपच मुश्किल ठरू शकेल.

 

‘जनसुराज्य’चे सर्वोसर्वा विनय कोरे यांच्यासाठी उद्याची विधानसभा अस्तित्वाची लढाई असेल. गेल्या निवडणुकीत शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात त्यांना शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. लोकसभा निवडणूक ही आपली विधानसभेची उपांत्यफेरी आहे असं समजून झपाटल्यासारखं सत्यजित पाटील यांनी काम केलं. या मतदारसंघात शिवसेनेचे विजयी उमेदवार धैर्यशील माने यांना २१ हजार ८६४ मतांचं चांगल लीड मिळालं आहे. ही गोष्ट सत्यजित पाटील यांच्या पथ्यावर पडणारी आहे. तसंच विनय कोरेंना मारक ठरणारी आहे. अवघ्या चार-सहा महिन्यात शिवसेना उमेदवाराला मिळालेलं शाहूवाडी-पन्हाळ्यातील लीड तोडणं हे विनय कोरे यांच्यापुढील खूप मोठं आव्हान असेल.

 

इचलकरंजी मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत. त्यांचा सामना तिसऱ्यांदा भाजपचे आ. सुरेश हाळवणकर यांच्याशी होईल. गेल्या दोन्ही लढतीत हाळवणकरांनी बाजी मारली आहे. राजू शेट्टी यांच्या पराभवासाठी हाळवणकरांनी अक्षरशः देव पाण्यात घातले होते. या मतदारसंघात ७४ हजार ९३० एवढं प्रचंड लीड शिवसेना उमेदवाराला देऊन हाळणकरांनी खुंटा हालवून बळकट केलाय. लोकसभा निवडणुकीतील विजयी शिवसेना उमेदवारांचं मताधिक्क्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची विधानसभेची वाट रोखणारं ठरू शकतं.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes