ऋतुराज पाटील ... सेनेच्या पायघड्या,.. काँग्रेस, राष्ट्रवादीचा पर्यायही खुला !
schedule03 May 19 person by visibility 5987 categoryराजकारण
विशेष प्रतिनिधी : द फायर
thefire.in@gmil.com)
ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील यांच्यासाठी राज्यातील सत्तारूढ युतीचा घटक पक्ष असलेली शिवसेना रेड कार्पेट अंथरेल असे राजकीय वर्तुळातील संकेत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक कोल्हापूर उत्तर मधून लढण्यासाठी त्यांच्यापुढे राष्ट्रीय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचाही पर्याय खुला आहे.डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांचे चिरंजीव असलेले ऋतुराज सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्ये शिवबंधनात अडकतील, अशी चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत
शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या कोल्हापूर उत्तर मधील प्रचाराची सर्व धुरा युवा नेते ऋतुराज पाटील यांनी सांभाळली होती. प्रा. मंडलिक यांच्या माध्यमातून ऋतुराज पाटील यांचा धनुष्यबाण हाती घ्यायचा मार्ग प्रशस्त होईल अशी चर्चा आहे.
काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य आ. सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे आहेत. शैक्षणिक संस्था, प्रतिष्ठान, क्रीडा संघटना, सामाजिक उपक्रम अशा डीवायपी समूहातील संस्थांच्या व्यासपीठावरूनगेली काही वर्ष ऋतुराज पाटील सक्रीय आहेत. त्यांनी युवकांचही भक्कम संघटन उभे केले आहे. राज्य विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्याचा त्यांचा हेतू लपून राहिलेला नाही. चुलते सतेज ऊर्फ बंटी पाटील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. पाटील यांचे राजकारणातील हाडवैरी महादेवराव महाडिक यांनी आपले पुत्र अमल यांना या मतदारसंघातून बंटी पाटील यांच्या विरोधात उतरवून पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे बंटी पाटील यांना राजकीय आघाडीवर मोठा धक्का बसला होता. विधानसभेनंतर काही कालावधीत झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून बंटी पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षातर्फे निवडणूक लढविली होती.तत्कालीन विधानपरिषद सदस्य महादेवराव महाडिक यांना पराभूत करून बंटी पाटील यांनी विधानसभेतील पराभवाचे उट्टे काढले होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे विद्यमान खा. धनंजय महाडिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यास बंटी पाटील यांनी टोकाचा विरोध केला होता. महाडिक यांनी पाच वर्षात जिल्ह्यातीलसर्व निवडणूका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. महाडिक यांना विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातीलज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांची बंटी पाटील यांना साथ होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खा. महाडिक यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी विरोधाची भूमिका सोडून देत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारात झोकून दिले होते. मात्र महाडिक कुटुंबियांना राजकारणातून संपविण्याचा निर्धार केलेल्या सतेज पाटील यांनी हा निर्णय शेवटपर्यंत
स्विकारला नाही. 'आमचं ठरलयं' असा संदेश पोहोचवत बंटी पाटील व त्यांच्या मतदार संघातील समर्थकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला होता. कोल्हापूर उत्तर मधील प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे ऋतुराज पाटील यांनी हाती घेतली होती. राष्ट्रवादीच्या साम-दाम-दंड-भेद प्रचार तंत्राला त्याच भाषेत उत्तर देत ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मध्ये मोठ्या निर्धाराने प्रचार मोहिम राबविली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कोल्हापूर उत्तर मतदार संघात मोठे मताधिक्य मिळाल्यास त्यात ऋतुराज पाटील यांचा सिंहाचा वाटा असेल. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची विधानसभेत सध्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर प्रतीनिधीत्व करतात. क्षीरसागर यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यास पक्षातील एका मोठ्या गटाचा विरोध आहे त्याबरोबरच मित्रपक्ष भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी क्षीरसागर यांचा प्रचार करण्यास स्पष्ट नकार दिला
आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेतर्फे उमेदवारीसाठी ऋतुराज पाटील यांचे नाव पुढे करायच्या हालचाली पडद्याआड सुरू आहेत. याबरोबरच त्यांचे चुलते आ. सतेज पाटीलयांनी अगामी विधानसभा निवडणूक कोल्हापूर दक्षिण मधूनच काँग्रेसतर्फे लढविण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ऋतुराज पाटील यांच्यापुढे शिवसेनेबरोबरच काँग्रेस आघाडीतील
राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभे राहण्याचा पर्यायही खुला आहे.