विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि क्षमता ओळखून करिअरचे क्षेत्र निवडावेःप्राचार्य महादेव नरके
schedule01 Aug 20 person by visibility 472 categoryशिक्षण
कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः
दहावीनंतर विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि क्षमता ओळखून करिअरचे क्षेत्र निवडावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी केले. ते कसबा बावडा डॉ डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावीनंतरच्या करिअरच्या संधी या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.
प्राचार्य डॉ महादेव नरके म्हणाले, दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर निवडायचे? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर उभा राहतो. त्यामुळं करिअर म्हणजे काय ? त्यासाठी कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात ? हे सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. दहावीनंतर विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रातील अद्ययावत माहिती घेऊन आपली आवड आणि क्षमता ओळखून करिअर निवडले पाहिजे हे उदाहरणांसह स्पष्ट केले. पालकांनीही विद्यार्थ्यांचा कोणत्या क्षेत्राकडे कल आहे हे ओळखून त्यांना त्यांच्या करिअरसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. डॉ. नरके यांनी दहावीनंतरची डिप्लोमा इंजिनिअरिंगची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, शासनाच्या विविध शिष्यवृत्ती याची माहिती दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा नितीन माळी यांनी दहावी नंतरच्या संधीबाबत माहिती देतांना आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स या शाखांमध्ये प्रवेश घेण्याबरोबरच आयटीआय, एमबीए, मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ , आय टी आय, पॅरा मेडिकल , नर्सिंग आधी अभ्यासक्रमातून करिअर करता येत असल्याचे सांगून पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्रथमवर्षाचे समन्वयक प्रा बी जी शिंदे यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगची प्रवेशासाठी पात्रता आणि आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली. उपप्राचार्या मीनाक्षी पाटील यांनी पॉलीटेक्निकच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. समन्वयक म्हणून प्रा असिफ पटेल यांनी काम पाहिले.