राज्यातील साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचालिका श्रीमती पार्वतीबाई मोरे यांचे निधन
schedule01 Aug 20 person by visibility 638 categoryमहिला
सरवडे:द फायर:प्रतिंनिधी:
सरवडे (ता. राधानगरी) येथील सहकार क्षेत्रातील महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचालिका, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी, स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांच्या पत्नी व 'बिद्री' चे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई कृष्णाजी मोरे यांचे शनिवार सकाळी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले.
श्रीमती मोरे यांनी स्वातंत्र्य लढ्यात पतीबरोबर हिरीरीने भाग घेतला होता. राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेत सामाजिक जाणिवेने काम करीत राहिल्या. सहकार क्षेत्रातून १९७८ साली महाराष्ट्रातील बिद्री साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचालिका होण्याचा मान मिळविला. त्यानंतर १९९२ मध्ये झालेल्या सरवडे जि. प. निवडणूकीत अपक्ष म्हणून विजय मिळविला. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहत काम केले.
शनिवारी सकाळी त्यांचे देहावसान झाले. त्याचे पुत्र विजयसिंह मोरे यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवास अग्नी देण्यात आला. या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात डी. के. मोरे, राधानगरी पंचायत समितीचे माजी सदस्य आर. के. मोरे, जयवंत मोरे अशी चार मुले सूना व नातवंडे असा परिवार आहे.