पावसाचा जोर कायम,पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, महापुराचे सावट
schedule05 Aug 20 person by visibility 971 categoryइतर
कोल्हापूरः द फायरःप्रतिनिधीः जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास 39 फुटांची इशारा पातळी गाठली. त्रेचाळीस फुटाच्या धोक्याच्या पातळीकडे नदीचे पाणी वाढत असल्याने महापुराचे सावट निर्माण झाले आहे .सलग तिसऱ्या दिवशी आज जिल्ह्यासह शहरातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ होते आहे. धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .तसेच चिखली सारख्या गावातून स्थलांतरही सुरू करण्यात आले आहे .आज शहराजवळील कळंबा तलाव दुपारी अवघ्या दोन दिवसांच्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला .त्यामुळे जयंती नाला ही दुथडी भरून वाहू लागल्याने शहराच्या लक्ष्मीपुरी शाहूपुरीतील काही भाग, व्हीनस कॉर्नर आदी भागात रस्त्यावर पाणी आले .पावसाचा जोर कायम राहिल्याने शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले आहे पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगा नदीतील पाणी पातळी 39 फुटांची इशारा पातळी ओलांडून त्रेचाळीस फुटांच्या धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत चालली आहे .त्यामुळे शहरावर महापुराचे सावट आले आहे .जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने 100 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडले आहे.