अवकाळी ‘पाहुणा’ करणार मृगाचे स्वागत
schedule03 Jun 20 person by visibility 303 categoryपर्यावरण
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीसह कोल्हापूर जिल्ह्यातही गेले दोन दिवस अवकाळी पाऊस पडतो आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा अवकाळी ‘पाहुणा’ आणखी किमान चार दिवस मुक्कामाला असणार आहे. म्हणजे मान्सून मधील मृग नक्षत्राचे स्वागत अवकाळी पाहुणा करणार आहे.
अरबी समुद्रात आधी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे कोकण किनार पट्टीसह दक्षिण महाराष्ट्रात गेले दोन दिवस अवकाळी पाऊस पडतो आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या वादळाला निसर्ग असे नाव देण्यात आले आहे. या वादळाचा तडाखा आज दुपारी मुंबई परिसराला बसेल असा अंदाज आहे. वादळाची वाटचाल तशीच आहे. मात्र या वादळामुळे कोकण किनारपट्टीसह दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यात गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. कधी भुरभुर तर कधी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे. हीच परिस्थिती आणखी चार दिवस म्हणजे सात जून पर्यंत राहणार आहे. मृग नक्षत्राची सुरुवात सात जून रोजी होते. तोपर्यंत हा अवकाळी पाहुणा मुक्काम टाकणार आहे. एक प्रकारे मृगाचे स्वागत हा पाहुणा करणार आहे. आज पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोल्हापूर व परिसरात पडल्या सकाळीही पावसाची भुरभुर सुरूच होती. अगदी मान्सून सेट झाल्यानंतर जसे पावसाळी वातावरण असते तसेच वातावरण जिल्ह्यात सर्वत्र आहे.