गर्भवती असताही मिनल दाखवे-भोसले यांनी दिवसरात्र झटून तयार केले करोना टेस्ट किट
schedule28 Mar 20 person by visibility 649 categoryनवनिर्मितीमहिला
पुणे : करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी भारतात चाचणीसाठी योग्य ती सुविधा नसल्याची टीका केली जात होती. मात्र महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांनी दिवसरात्र मेहनत करत भारतातील पहिलं करोना टेस्ट किट तयार केलं आहे. मिनल भोसले यांनी गर्भवती असतानाही करोना टेस्ट किट तयार केले. करोना टेस्ट किट जन्माला घातल्यानंतर काही तासातच त्यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. मायलॅब डिस्कव्हरी या भारतातील पहिल्या फार्माकंपनीला टेस्ट किटची निर्मिती तसंच विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. टेस्ट किट तयार केल्यानंतर पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरु येथील १५० लॅबना पाठवण्यात आले आहेत. मायलॅबच्या या किटची किंमत केवळ १२०० रुपये आहे. ही एक किट तब्बल १०० नमुन्यांची चाचणी घेऊ शकते.
हे टेस्ट किट तयार करण्यात मायलॅबच्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख असणाऱ्या विषाणूतज्ज्ञ मिनल भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. प्रसुतीच्या काही तास आधीपर्यंत करोना निदानसाठी लागणाऱ्या या किटचं संशोधन त्या करत होत्या. “आमच्या किटच्या सहाय्याने फक्त अडीच तासात निदान होणार आहे. तर याउलट परदेशातून मागवण्यात आलेले किट सहा ते सात तास घेतात. हे किट रेकॉर्ड टाइममध्ये बनवण्यात आल्याचे मिनल भोसले सांगतात. हे किट बनवण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, पण आम्ही फक्त सहा आठवड्यांत हे किट तयार केले आहे असे त्यांनी सांगितले.
आणीबाणीची परिस्थिती असल्याने मी हे आव्हान म्हणून स्वीकारले. मला माझ्या देशाची सेवा करणे भाग होते,” अशी भावना मिनल भोसले यांनी व्यक्त केली आहे. पण यामागे आपण एकट्या नसून १० जणांच्या आपल्या टीमने खूप कष्ट घेतले असल्याचे सांगतात. प्रसूतीच्या एक दिवस आधी म्हणजेच १८ मार्चला मिनल भोसले यांनी आपले किट मान्यतेसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी) सोपवले. त्याच संध्याकाळी रुग्णालयात दाखल होण्याच्या काही तास आधी त्यांनी किटला मान्यता मिळावी यासाठी FDA आणि CDSCO यांच्याकडे प्रस्ताव सोपवला