कोरोनावरील लसीची कोल्हापुरात होणार मानवी चाचणी
schedule31 Jul 20 person by visibility 447 categoryआरोग्य
कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोनाव्हायरसने जगभर हाहाकार माजविला आहे. भारतातही या साथीने थैमान घातले आहेत.या रोगावर औषध शोधण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. भारतातही त्या दिशेने अत्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.देशात तयार झालेल्या लसीची मानवी चाचणी गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे. नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अर्थात एम्स इस्पितळात कोव्हॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू झाली आहे.याच लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी कोल्हापुरात होणार आहे. कोल्हापूर हे कोरोनावरील लसीच्या चाचणीचे देशातील तेरावे केंद्र असेल.हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने ही लस तयार केली आहे.
आयसीएमआर व राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा तथा एन. आय व्ही .या संस्था यांनी याकामी त्यांना सहकार्य केले आहे.केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण विषयक देशातील सर्वोच्च संस्थेने या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी दिली आहे.त्यानंतर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात पहिल्या मानवी चाचणीला प्रारंभ झाला आहे. एम्स बरोबरच देशातील आणखी बारा केंद्रावर मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे .त्यात आता कोल्हापूर हे तेरावे केंद्र असेल. रक्त तसेच कोविदसह अन्य चाचण्या करून कोव्हॅक्सिन लसीची चाचणी करण्यासाठी सुदृढ प्रकृती असलेल्या स्वयंसेवकांची निवड केली जाते.
कोल्हापुरात 100 स्वयंसेवक यांच्यावर मानवी चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे समजते .येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना वरील लसीची चाचणी केली जाणार आहे.त्यासाठी सोमवारपासून स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार असल्याचेही समजते.या महाविद्यालयाच्या नैतिक समितीने येथे कोरोनाव्हायरस वरील लसीची मानवी चाचणी करण्यास अनुमती दिली आहे. या लसीची चाचणी होणारे कोल्हापूर हे नागपूर नंतर राज्यातील दुसरे केंद्र ठरेल.