पावसाळ्यानंतर आयपीएल आयोजनाचा विचार: बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची माहिती
schedule21 May 20 person by visibility 193 categoryक्रिडा
मुंबई: करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. गेली दोन महिने भारतात कोणतीही क्रीडा स्पर्धां झालेली नाही. २९ एप्रिलपासून नियोजित असलेली आय पी एल स्पर्धा देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आय पी एल 2020 आयोजन रद्द झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आय पी एल चे आयोजन करायचेच असा निर्धार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सुत्रांच्या हवाल्याने आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आय पी एल 2020 चे आयोजन करण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ करत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनीही आय पी एल बद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
“गेल्या वर्षी देशभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जेवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापेक्षा जास्त लोकांनी आय पी एल चा आस्वाद घेतला. प्रायोजकांसाठी क्रिकेट हाच नेता आहे आणि तोच त्यांना मार्ग दाखवतो. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा क्रिकेटमुळे जनजीवन सुरळीत होण्यास लवकर मदत होईल. असे जोहरी यांनी टीसीएम स्पोर्ट्स हडल वेबिनारमध्ये नमूद केले.
“जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा, स्पर्धा सुरू होण्याआधी प्रत्येकाला स्वत:ला क्वारंटाईन करावं लागेल. प्रत्येक खेळाडूचं वेळापत्रक कसं आहे, याबाबत माहिती घेऊनच त्यावर विचार करण्यात येईल. आम्ही सारे खूप आशावादी आहोत. आम्ही आशा करतो की पावसाळा संपेपर्यंत परिस्थिती सुधारली असेल. म्हणून आम्ही पावसाळ्यानंतर आय पी एल आयोजनाचा विचार करत आहोत”, अशी माहिती जोहरी यांनी दिली.