केडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांचा दोन लाखांचा अपघाती विमा; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
schedule05 Jun 20 person by visibility 263 categoryकृषीराजकारण
कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८५ वर्षे वयापर्यंतच्या जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरला आहे. या विम्याच्या हप्त्याची ९१ लाखाची सर्वच रक्कम जिल्हा बँक नफ्यामधून भरणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बंधूंना कोणतीही तोशीस लागणार नाही. बँकेशी संलग्न सेवा संस्थांचे कर्जदार आणि बिगर कर्जदार असे दोन्ही प्रकारचे शेतकरी या योजनेत समाविष्ट आहेत, असे स्पष्टीकरणही श्री . मुश्रीफ यांनी केले आहे.
अपघातांच्या या प्रकारांमध्ये रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, , वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत अपघाती मृत सभासदाच्या वारसाला दोन लाख रुपये भरपाई मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार 210 कर्जदार व बिगर कर्जदार सभासद शेतकऱ्यांना या विमा सुरक्षेचे कवच लाभले आहे. कायमचे आणि अंशतः अपंगत्व आल्यासही शेतकऱ्याला या योजनेमधून भरपाई मिळणार आहे.
या योजनेबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन स्पर्धात्मक निविदा मागवल्या होत्या. ८५ वर्षे वयापर्यंत विमासुरक्षा देणारी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही कंपनी पुढे आली. वयाने जादा असलेल्या शेतकऱ्यांना याचा ज्यादा फायदा होईल, या उद्देशाने संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज विमा कंपनीला धनादेश देऊन सुरुवात केलेली आहे, मुदत एक वर्षापर्यंत आहे.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गेल्या आर्थिक वर्षात १३५ कोटी रुपये ढोबळ नफा झाला आहे . त्यातूनच या बँकेचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही योजना आणली आहे.
शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये ऑक्टोबरपासून मार्चपर्यंतचे व्याज न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँकेने शेतकरी किंवा सोसायटीला भुर्दंड न बसविता १३५ कोटी रुपये नफ्यामधून तरतूद केली आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हीताचे अनेक निर्णय बँक यापुढेही घेणार आहे.
यावेळी बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, सर्जेराव पाटील- पेरीडकर, पी.जी.शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, श्रीमती उदयानीदेवी साळोखे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए.बी.माने व श्री.जी.एम.शिंदे आदी उपस्थित होते.
अशी आहे वैयक्तिक अपघात विमा योजना.......
-जिल्हा बँकेकडून भारती एक्सा जनरल इन्शुरन्सच्या सहयोगातून अपघाती विमा योजना.....
-सेवा संस्थाकडील कर्जदार व बिगर कर्जदार अश्या एकूण दोन लाख 52 हजार 210 शेतकऱ्यांना विमा सुरक्षाकवच......
-अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई.......
-कायम अपंगत्व व अंशतः अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार त्या- त्या प्रमाणात भरपाई.......
-शेतकऱ्यांना तोशीस लागू न देता बँकेनेच उचलला विमा हप्त्याचा भार..........
शेतकऱ्यांची वरदायिनी...........
बँकेने जुलै व ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व महापूर बाधित शेतकऱ्यांना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुक्रमे सात व सहा महिन्यांच्या व्याजाची 16 कोटी रुपये व्याजाची रक्कम बँक भरणार आहे. ऊसउत्पादकाशिवाय इतर शेतकरी जे भात, सोयाबीन, भुईमूग, कापूस इत्यादी पिकांसाठी कर्ज घेतात त्यांनाही रुपये एक लाखापर्यंतच्या कर्जास व्याज माफ आहे. एक लाखापासून तीन लाखापर्यंत कर्जाला फक्त दोन टक्के व्याज आकारणी केली जाते. शेतकऱ्यांचे हे व्याजही कोरोनामुळे बँकच भरणार आहे. म्हणजेच इतर पिकाच्या कर्जदार शेतकऱ्यांना दोन वर्षे व्याज भरावे लागणार नाही.