आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितराव सडोलीकर यांचे निधन
schedule04 Aug 20 person by visibility 714 categoryराजकारण
कोल्हापूरः द फायरः प्रतिनिधीः जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितराव सडोलीकर यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. व्यवसायाने वकील असलेल्या सडोलीकर यांचे मृत्यूसमयी 61 वर्षे वय होते. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे सदस्य असलेले सडोलीकर चार दशकाहून अधिक काळ राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते .दलित पॅंथरमधून त्यांच्या सामाजिक कार्याला प्रारंभ झाला आणि रिपब्लिकन पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली.
पक्षीय कामाबरोबरच कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक नागरी आंदोलनात त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून योगदान दिले .कोल्हापूर शहरातील नागरी समस्या ,टोलविरोधी आंदोलन, खंडपीठ आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला .अखेरपर्यंत ते सक्रिय राहिले .मंगळवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि पहाटे पावणे दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सकाळी कसबा बावडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी ,दोन मुले ,आई, वडील ,बहिण ,भाऊ असा मोठा परिवार आहे .जलदान विधी सहा ऑगस्ट रोजी होणार आहे.