Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचे कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन; ‘व्हायरस कवच’ फॅब्रिक स्प्रेची निर्मिती

schedule18 Jul 20 person by visibility 272 categoryनवनिर्मिती

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:

संपूर्ण जगाला ग्रासलेल्या ‘कोविड-१९’ अर्थात कोरोना या विषाणूला निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक संशोधन येथील शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केले आहे. येथे संशोधित करण्यात आलेल्या ‘व्हायरस कवच’ या फॅब्रिक स्प्रे (कपड्यांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रिय करणे शक्य होणार आहे. ही माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे दिली.

विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ.पी.एस. पाटील, डॉ. किरणकुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी कुलगुरू डॉ. करमळकर व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना भेटून या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन व उत्पादनाबद्दल माहिती दिली. ‘व्हायरस कवच’ तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-१९ विषाणू ९९.९९ टक्क्यांपेक्षाही अधिक निष्क्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी.एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील संशोधन केले आहे.

काय आहे संशोधन?

‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञान’ हे वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे आहे. हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. वाळल्यानंतर पुढे तो कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारले की झाले. यामध्ये केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिडची संयुगे आहेत, जी अजिबात विषारी नाहीत, तर पर्यावरणपूरक आहेत, असा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सी- ‘USEPA’ ने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे.

कशी होणार उपलब्धता?

‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे’ हा लवकरच सर्व महत्त्वाच्या औषध दुकानांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याची किंमत २५० मि.ली. बाटलीसाठी रु. २७० तर ५०० मि.ली. साठी रु. ४९५ इतकी असणार आहे. सध्या पुण्यातील ‘इकोसायन्स’च्या प्रकल्पाची सुमारे ५००० बाटल्या प्रतिदिन इतकी उत्पादन क्षमता आहे.

विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाचे मोलाचे संशोधन

शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागामध्ये गतवर्षी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अंतर्गत प्राप्त निधीमधून ‘सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स’ सुरू करण्यात आले. केंद्राने पहिल्याच दणक्यात साऱ्या जगाची डोकेदुखी असणाऱ्या कोविड-१९ या विषाणूला निष्क्रिय करणाऱ्या संयुगाची निर्मिती करून प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. ‘व्हायरस कवच’ संयुगाच्या संशोधनाने भारत सरकारच्या निती आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या स्पर्धेत पहिल्या पाच अभिनव संशोधनांत स्थान मिळविले होते. या संशोधनाला मूर्त स्वरुप देऊन समाजापर्यंत आणण्यासाठी इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती देणारे संशोधन: कुलगुरू डॉ. करमळकर

कोविड-१९ साथीला आटोक्यात आणण्याबरोबरच या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठीचे संशोधन साऱ्या जगभरात सुरू आहे. प्रत्येक समाजघटक आपापल्या परीने त्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात तर या विषाणूने कहर मांडला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागाच्या संशोधकांनी ‘व्हायरस कवच’ या संयुगाची निर्मिती करून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती दिली आहे. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes