मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस शक्य
schedule01 Jun 20 person by visibility 364 categoryपर्यावरण
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या २४ तासांत आणखी वाढणार आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होणार आहे. ३ जून रोजी हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून रायगडमधील हरिहरेश्वरपासून ते दमणपर्यत पट्ट्यात त्याचा परिणाम जाणवणार आहे. या तीन दिवसांत मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊसही पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली.
मुंबईला चक्रीवादळाचा धोका
कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ असा दुहेरी धोका आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाणार आहे. पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असतील आणि ३ जूनला संध्याकाळी किंवा रात्री चक्रीवादळ घोंगावू शकते. मुंबईत ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.