नामवंत मल्ल सादिक पंजाबी यांचे वृद्धापकाळाने लाहोर येथे निधन
schedule22 Jul 20 person by visibility 246 categoryक्रिडा
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: नामवंत पाकिस्तानी पैलवान सादिक पंजाबी यांचे नुकतेच निधन झाले. लाहोर येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे समजते मातीवरील कुस्तीत जगभर नाव कमावलेल्या सादिक पंजाबी यांची जडणघडण खऱ्या अर्थाने कोल्हापुरात झाली. मूळचे पाकिस्तान मधील लाहोरचे असले तरी कोल्हापुरात त्यांची कुस्ती नावारूपाला आली. येथील शाहू विजयी गंगावेस तालमीत 1960 ते 1963 या कालावधीत त्यांनी सराव केला. तसेच त्यानंतर बुधवार पेठेतील निरंजन मठ तालमीत ते सरावासाठी दीर्घकाळ वास्तव्याला होते. कोल्हापुरातील या कालावधीत त्यांची खऱ्या अर्थाने जडण-घडण झाली. समकालीन हिंदकेसरी मारुती माने यांच्याशी सादिक पंजाबी यांची चांगली मैत्री होती. तसेच त्यांचा हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्याशी चांगला संपर्क होता. कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर ते पाकिस्तानात परतले आणि लाहोर येथील तालमीत ते मल्लांना माती तसेच गादीवरील कुस्तीचे धडे देत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानात अनेक बदल घडले. आयुष्यात पुन्हा एकदा कोल्हापुरात येऊन रंकाळ्यावर फिरायचे आहे अशी इच्छा त्यांनी दीनानाथ सिंह यांच्याकडे अनेकदा व्यक्त केली होती. मात्र ती आता अपुर्णच राहणार आहे.
सादिक यांचा मुलगा सज्जन पंजाबी हाही एके काळी गाजलेला मल्ल होता. तोही आखाड्यात नव्या मल्लांना मार्गदर्शन करतो. पाकिस्तानी असली तरी सादिक पंजाबी यांना भारतात विशेषतः कोल्हापुरात कुस्ती शौकीन यांच्याकडून खूप प्रेम व प्रोत्साहन मिळाले. याचा ते आवर्जून उल्लेख करत. अत्यंत देखणे असलेले सादिक पंजाबी त्या काळातील बड्या पैलवान मंडळीत ओळखले जात. त्यांच्या भारतीय पैलवान बरोबरच्या अनेक कुस्त्या गाजल्या होत्या.