सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून गणेशोत्सवासाठी 50 रुपयांचा हप्ता: अध्यक्ष नवीद मुश्रीफ
schedule11 Jun 20 person by visibility 616 categoryकृषीउद्योग
कागल:द फायर: प्रतिंनिधी:
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून गणेशोत्सवासाठी प्रती टन 50 रुपयांचा हप्ता जमा करणार असल्याची माहिती, अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. पुढील गळीत हंगामापासून दहा हजार टन गाळप क्षमतेसह, एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती व ५० मेगावॅट क्षमतेचा कोजनरेशन विस्तारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.नव्याने रुजू झालेल्या जनरल मॅनेजर संजय श्यामराव घाटगे (रा. मुरगुड) यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्री घाटगे यांचे स्वागत झाले.
नवीद मुश्रीफ पुढे म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याने गेल्या सहा हंगामामध्ये अतिशय उत्कृष्ट गळीत करून ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. कारखान्याची या हंगामाची सगळी एफआरपी दोन महिन्यांपूर्वी 100% देऊन झाली आहे. परंतु गेल्या हंगामामध्ये उसाच्या उपलब्धतेसाठी 100 रुपये जादा देण्याचे अभिवचन आम्ही दिलं होत. 50 रुपये गणपती उत्सवाच्या काळामध्ये आणि 50 रुपये दसरा आणि दिवाळी या दोन सणाच्या मध्ये देण्याचं आम्ही आश्वासन दिले होते. त्यानुसार गणपती उत्सवाला 50 रुपये देऊन पूर्ण करत आहोत आणि राहिलेले 50 रुपये हे दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान देणार आहोत.
गेल्या सहा हंगामामध्ये कारखान्याने उत्कृष्ट काम केलं, आता सातवा हंगाम सुरू होत आहे. या सातव्या हंगामामध्ये नऊ लाख मॅट्रिक टन गाळप व्हावं,जास्तीत जास्त इथेनॉल निर्मिती व कोजन निर्मिती व्हावी अशी अपेक्षा कारखान्याचे संस्थापक नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.
जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी सात वर्ष कारखान्याची चांगली सेवा केली. त्यांना गावालगत दुसरा कारखाना झाल्यामुळे ते दुसऱ्या कारखान्यांमध्ये रुजू होत आहेत. त्यांच्या जागी संजय शामराव घाडगे हे मूळचे मुरगुडचे सुपुत्र मुख्य जनरल मॅनेजरपदी निवड होत आहे. त्यांचे मनापासून स्वागत करून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व खातेप्रमुख आणि चांगलं काम करावं आणि जे उद्दिष्ट संस्थापकांनी दिलेला आहे, ते पूर्ण करावं अशी अपेक्षा कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
असे होणार विस्तारीकरण ........
नवीद मुश्रीफ म्हणाले, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना वेज बोर्ड लवकरात लवकर नियमाप्रमाणे लावणे, त्यांना सोयी-सुविधा देणं, त्याबरोबर आंबेओहोळ व नागणवाडी हे दोन प्रकल्प अंतिम टप्प्यात आलेले आहेत. पुढील वर्षी त्याची घळभरणी होऊन पाणी अडविले जाणार आहे. या कारखान्याच्या लगतचा हा भाग असल्यामुळे फार मोठी उसाची उपलब्धता होणार आहे. त्यामुळेच कारखान्याची गाळप क्षमता सहा हजार मेट्रिक टनावरून दहा हजार मेट्रिक टन इतकी वाढविणे, ५० हजार इथेनॉल निर्मितीवरून ही क्षमता एक लाख लिटर करणे,को-जनमधून २३ मेगावॅटची निर्मीती 50 मेगावॅट करण्यासाठी कारखाना पुढील हंगामापासून हे प्रकल्प हातामध्ये घेणार आहे. तीनशे ते चारशे कोटी रुपयाची उभारणी करून हे काम पुढच्या वर्षी चालू करण्याचा मानस व्यवस्थापक मंडळाचा आहे.