जिल्ह्यातील सुमारे सातशे खाजगी रुग्णालये अधिसूचित
schedule04 Jun 20 person by visibility 329 categoryआरोग्य
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन 24 तास सक्रिय आहे. एका बाजूला रुग्णसंख्या वाढत असली तरी प्रशासन संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील तब्बल 694 खाजगी रुग्णालय अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढल्यास तेथे उपचार करणे शक्य होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने 14 मार्च 2020 रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सक्षम आधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच त्यांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 21 मे 2020 च्या अधिसूचनानुसार दवाखाने व रुग्णालय अत्यावश्यक सेवा ठरविण्यात आली आहे. या तरतुदीच्या आधारे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट 1949 नुसार नोंदणी केलेली 694 खाजगी रुग्णालय अधिसूचित केले आहेत. तेथील नऊ हजार 743 खाटा पैकी 80 टक्के खाटा तसेच या रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय उपचाराशी निगडीत तज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर अत्यावश्यक जीवरक्षक प्रणालीसह अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढल्यास या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार आहे.