करोनावर लस तयार करण्यात यश आल्याचा इस्राइलचा दावा
schedule05 May 20 person by visibility 378 categoryनवनिर्मिती
जेरूस्लेम : करोनावर लस तयार करण्यात यश आल्याचा दावा इस्राइलने केला आहे. इस्राइलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी देशातील जैविक संरक्षण संस्थेमध्ये करोना व्हायरसवर लस तयार करण्यात आल्याचे म्हंटले आहे.
'करोनाचा नायनाट करु शकेल अशा लसची निर्मिती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे संशोधकांनी पेटंट मिळवण्यासाठी व मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची तयारी सुरु केली आहे',असे नफ्ताली बेनेट यांनी सांगितले.
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाअंतर्गत अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या संशोधनाबाबत नफ्ताली यांनी लसीची घोषणा केली. नफ्ताली यांच्या दाव्यानुसार ही लस मोनोक्लोनल न्यूट्रॅलिटींगनुसार शरीरातील व्हायरसवर हल्ला करते आणि शरीरातच करोनाच्या विषाणूंचा नायनाट करते.
नफ्ताली बेनेट यांच्यावतीने याबाबत एक अधिकृत पत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. यात त्यांनी करोनावर लस शोधल्याबद्दल त्यांच्या संशोधकांचं अभिनंदन देखील केलं आहे. तसेच पेटंट मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्यासाठी संपर्क साधण्यात येईल, असेही म्हटले आहे.मात्र , या लसीचं मनुष्यप्राण्यावर चाचणी केली गेल्याचं पत्रकात कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही.