आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू काशिलिंग आडकेला घरातच जुगार अड्डा चालविताना अटक
schedule14 Apr 20 person by visibility 451 categoryक्रिडाइतर
सांगली: द फायर: प्रतिनिधी:
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू काशिलिंग आडकेला कासेगाव येथे राहत्या घरी जुगार व दारूचा अड्डा चालवीत असताना कासेगाव पोलीस ठाणे यांनी छापा टाकून अटक केली आहे. त्याच्याबरोबरच एका साथीदाराला ही अटक करण्यात आली आहे. तेथे 1लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कासेगाव पोलिसांनी काशिलिंग आडकेच्या घरी छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी कासेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी: सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास काशिलिंग व त्याचे साथीदार जुगार व दारू अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना खबर्यामार्फत मिळाली. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकला असता तेथे रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, आरोपीच्या मोटरसायकली व विदेशी दारू असा सुमारे 1लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस जप्त केला.
यावेळी जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलीसानी अटक केली. त्यात ज्योतीराम शिवाजी पाटील रा .कापूसखेड, पांडुरंग पाठसुटे, आरिफ मुल्ला, प्रशांत बडेकर, अतुल परीट, रसिक नायकवडी, हर्षद पाटील सर्व रा. कासेगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे. काशिलिंग आडकेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक व बेकायदेशीर दारू अड्डा चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू काशिलिंग आडके जुगार अड्डा चालविताना सापडल्याने खळबळ उडाली आहे. कबड्डीपटू काशीलिग हनुमान उडीसाठी प्रसिद्ध आहे. तो जुगार अड्डा चालविताना सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.