व्यापारी- उद्योजकांनी शक्यतो तीन मेपर्यंत बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे: पालकमंत्री सतेज पाटील
schedule18 Apr 20 person by visibility 980 categoryउद्योग
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्यात आला आहे तरीही 20 एप्रिल पासून काही अटीवर व्यापार व उद्योग तसेच कारखाने सुरु करण्यास शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. तरीही 3 मे पर्यंत लॉकडाऊनची वाढीव मुदत संपेपर्यंत उद्योग-व्यापार बंद ठेवावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले 20 एप्रिलपासून उद्योग- व्यवसाय सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि पालकमंत्री व प्रशासना यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. त्यावेळी श्री सतेज पाटील बोलत होते.
राज्य शासनाने 20 एप्रिल पासून राज्यातील विविध जिल्ह्यातील उद्योग-व्यापार सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वांचा आदेश काढल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील उद्योग-व्यापार संघटनांच्या प्रतिनिधींनी आज 18 एप्रिल जिल्हाधिकारी कार्यालयात पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील , आमदार चंद्रकांत जाधव , जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेतील मुद्दे खालील प्रमाणे: 1) पालक मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व औद्योगिक व व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींना आवाहन केले की, शक्यतो 3 मे पर्यंत उद्योग-व्यापार बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे. 2) ज्या उद्योजकांना उद्योग सुरू करायचे असतील त्या उद्योजकांनी कारखाना सुरू करीत असताना त्यांच्या कामगारांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था कारखान्यात करता येत असेल तर त्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. 3) कारखाना सुरू करण्याची मार्गदर्शक तत्त्वे व आदेश याचा उद्योजक व्यापाऱ्यांनी पूर्ण अभ्यास करून एमआयडीसीमधील कारखानदारांनी एमआयडीसीच्या संकेतस्थळावर http://permission.midcindia.org/ येथे अर्ज करून परवानगी घेऊनच 20 एप्रिल पासून उद्योग सुरू करता येतील. 4) महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील उद्योग आणि व्यापार सुरु करण्यास सध्यातरी परवानगी नाही, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, सचिन शिरगावकर, रंणजीत शाह, अतुल पाटील, संजय शेटे, गोरख माळी, विज्ञान मुंडे, संजय पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रदीप व्हरांबळे इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.