Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

मुश्रीफांचे कडवे विरोधक समरजितसिंह होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष; राहुल चिकोडेंना पुढे चाल !

schedule10 Jan 20 person by visibility 981 categoryराजकारण

कोल्हापूर : द फायर - प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची निवड निश्चित मानली जात आहे. कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी विद्यमान प्रभारी अध्यक्ष राहुल चिकोडे यांचीच नियुक्ती होईल, असे समजते.

भाजपने जिल्ह्यातील मंडल, तालुका, जिल्हाध्यक्ष व महानगर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बुथ प्रमुखांची निवड प्रक्रिया पार पडली आहे. आता शहरातील सात व ग्रामीण भागातील १४ मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू आहे. ती येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे. त्यानंतर महानगर व जिल्हा ग्रामीण अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर निवड प्रक्रिया समितीचे अध्यक्ष आहेत. महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी प्रभारी राहुल चिकोडे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अशोक देसाई, ॲड. संपतराव पवार, गणेश देसाई यांनी तर ग्रामीण अध्यक्षपदी सध्या हिंदुराव शेळके असून अनेक पदाधिकाऱ्यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. ही सर्व नावे राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील, निवड प्रक्रियेचे अध्यक्ष माजी आमदार हळवणकर आणि राज्यातील २२ उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यभरातील महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली.

या चर्चेअंती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समरजितसिंह घाटगे यांच्यावर सोपविण्याचा निर्णय झाल्याचे समजते. समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे राहत कडवी झुंज दिली होती. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही ते तत्काळ समाजकारण व राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांच्या पाठीशी मोठे संस्थात्मक बळ तसेच कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. भाजपच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आहेत. त्यांना शह देण्यासाठीच त्यांचे पारंपरिक विरोधक समरजितसिंह घाटगे यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद सोपविण्याचा निर्णय झाल्याचे समजते. 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes