Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

कोल्हापूरच्या सरलाबाई लिंग्रस...नाबात १००

schedule11 Mar 20 person by visibility 430 categoryमहिला

कोल्हापूर (द फायर प्रतिनिधी) : सरलाबाई लिंग्रस. ‘शतकेपार झेंडा’ रोऊन त्या १२ मार्च रोजी १०१ वर्षांच्या होत आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूरचा. १२ मार्च १९२० हा त्यांचा जन्मदिवस. आपल्या आरोग्याचे रहस्य नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन हेच असल्याचे त्या सांगतात. उतारवयातही त्या अगदी ठणठणीत आहेत. कोणाच्याही आधाराशिवाय त्यांची हालचाल आजही सुरू आहे. त्यांचा खाण्यात कोणतेही पथ्यपाणी नाही. त्यांना ना बीपीचा त्रास, ना शुगरची गोळी. त्यांचा उत्साह तरुणाईलाही लाजवणारा आहे.

कोल्हापुरातील खासगी पायलट गणपतराव लिंग्रस यांच्याशी सरलाबाईंचा विवाह १९३७ मध्ये झाला. आपल्या विवाहात राजाराम महाराज उपस्थित असल्याचेही त्या आनंदाने व अभिमानाने सांगतात. गणपतराव लिंग्रस यांच्याकडे बर्मा इंडियन एरो क्लबचा विमान चालविण्याचा परवाना होता. त्यांना राजाराम महाराजांनी वैमानिक प्रशिक्षणासाठी कराचीला पाठवले होते. प्रशिक्षणानंतर राजाराम महाराजांनी गणपतरावांना आपल्याकडेच पायलट म्हणून नेमले. तसा लिंग्रस परिवार कोल्हापुरातील व्यापही मोठा होता. त्यामुळे सण समारंभ, पाहुणेरावळे या घरातल्या जबाबदाऱ्या आपसूकच सरलाबाईंवर येऊन पडल्या. या जबाबदाऱ्या पेलवताना त्यांच्या शरीरावर ताण पडू लागला. आदरातीथ्य आणि सुगरण हे त्यांची आणखी काही गुणवैशिष्ट्ये.

वयाच्या या टप्प्यावर त्यांच्याकडे अनुभवाचा खजिनाच आहे. स्वतःच्या आरोग्याबद्दल तर त्या जागरूक आहेतच. मात्र इतर कोणीही कधीही आजारी पडल्यास त्या कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोमट पाणी प्यायल्याने शारीरिक त्रास कमी होतात असे त्यांच्या वाचनात आले. तेथपासून आजपावेतो त्या फक्त कोमट पाणीच पितात. त्यांनी प्रवासातही या आपल्या सवयीशी कोणतीही तडजोड केली नाही.  त्यांच्या मते कोमट पाण्याने पचनशक्ती सुधारते. परिणामी, मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.

सरलाबाईंचा गोतावळा मोठा आहे. त्यांना सहा अपत्ये आहेत. तीन सुना, तीन जावई, १६ नातवंडे, १२ परतवंडे आहेत. आजही त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ आहे. या वयातही त्या रागावत नाहीत, की अस्वस्थ होत नाहीत. नेहमी समाधानी राहतात. या वयातही त्या आपल्या आवडीनिवडी जपतात. त्यांना संगीतात रुची आहे. त्यांना भजने गाण्याची आवड आहे. हार्मोनियमवर तासन्‌तास त्या सूर छेडत बसतात. पुस्तकं, वृत्तपत्र वाचतात. वयाच्या शंभरीमुळे त्यांच्या हालचालींवर काही मर्यादा आल्या आहेत, तरीही आहारविहाराच्या सवयी, तसेच कोमट पाण्यामुळे त्या निरोगी जीवन जगत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes