लैंगिक छळ : विद्यापीठाने शासनाची फसवणूक केली, डॉ. नानिवडेकर यांचा दावा
schedule11 Mar 20 person by visibility 395 categoryमहिला
कोल्हापूर (द फायर प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात 2012 ते 2014 च्या काळात तत्कालीन कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे आणि डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी विविध लैंगिक छळाची चौकशी नियमबाह्य रीतीने लांबवत शासनाला या प्रकरणाचे नऊ खोटे अहवाल सादर केल्याचा खळबळजनक दावा स्त्री अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉ. मेधा नानिवडेकर यांनी आज केला.
डॉ. मेधा नानिवडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवाजी विद्यापीठात 2013 मध्ये दाखल झालेल्या एका केसमध्ये लैंगिक छळ करणार्या दोषीला वाचविण्यासाठी अपिलिय समितीतील प्रमुख डॉ. मुळे आणि पाटणकर यांनी संगनमताने चौकशी अहवाल 22 महिने लांबविला होता. त्याचप्रमाणे 2013 मध्ये विद्यापीठातील लैंगिक छळाच्या दाखल झालेल्या केसेस मधील गैरव्यवहार लपविण्यासाठी खोटे अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर मध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाची तक्रार दाखल झाली. मुळे आणि पाटणकरांच्या मागील गैरव्यवहारांमुळे लांबलेली प्रकरणे त्यांनी इतर मासिक आढाव्यात टाकून ती प्रकरणे सात ते आठ महिन्यातील असल्याचे दाखविले व जाणिपूर्वक इतर प्रकरणे लांबविली. या दिरंगाईमुळे पीडितांना तीव्र मनस्ताप आणि वरिष्ठांकडून छळ सहन करावा लागला.
सदर खोट्या अहवालांकडे डॉ. मेधा नानिवडेकर यांनी विद्यमान कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. आता लैंगिक छळ चौकशीतील गैरव्यवहारांमधील न्या. शानबाग समितीची कार्यवाही सुरू असेल तर समितीपुढे खोटे अहवाल सादर करण्याची संधी तरी द्या नाहीतर समितीचा दडपून ठेवलेला अहवाल जाहीर करा, या मागणीचा पुनरुच्चार ही डॉ. नानिवडेकर यांनी केला.