कागल पालिकेच्या व्ही. ए. घाटगे बोट क्लबचे होणार खासगीकरण
schedule02 Mar 20 person by visibility 98 categoryइतर
कागल (द फायर प्रतिनिधी) : कागल नगर परिषद मालकीच्या व्ही. ए. घाटगे बोट क्लब म्हणजेच पाझर तलावाचे आता खासगीकरण होणार आहे. याबाबत आज, सोमवारी अनुभवी बोट क्लबचालक, मक्तेदारांकडून नगरपरिषदेने निविदा मागविल्या आहेत.
कागल नगर परिषदेच्या स्थायी समितीमार्फत व्ही. ए. घाटगे बोट क्लब व तेथील कँटीन मक्ता पद्धतीने चालविण्यास देण्याबाबत अनुभवी बोट क्लबचालक, मक्तेदार तसेच हॉटेल चालक, मालक यांना ई-निविदा देण्याचे जाहिरातीद्वारे आवाहन करण्यात आले आहे. २ वर्षे ११ महिन्यांच्या मुदतीसाठी हा बोटिंग क्लब चालविण्यास देण्यात येणार आहे. प्रतिवर्ष तीन लाख ९० हजार रुपये अशी अपेक्षित रक्कम आहे. निविदा अर्जाची रक्कम एक हजार रुपये, तर बयाणा रक्कम तीन हजार ९०० रुपये आहे.
बयाणा रक्कम व निविदा अर्ज रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. निविदा देणारी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेची आयकर, जीएसटी नोंदणी असणेही बंधनकारक आहे. बोटिंग व्यवसायातील पाच वर्षांचा अनुभव तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची संस्थेला मान्यता असणे आवश्यक आहे.
कोरी निविदा http:mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. २ मार्च रोजी सकाळी ११ पासून ११ मार्च दुपारी दोनपर्यंत ऑनलाईन पाहावयास मिळतील. भरलेली निविदा सादर करण्याची मुदत ११ मार्च दुपारी दोनपर्यंत राहील. १२ मार्च रोजी दुपारी चार वाजता निविदा उपस्थितांसमोर उघडण्यात येतील.