Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

बॉलीवुडचा "सुरमाभो पाली" हरपला; ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

schedule09 Jul 20 person by visibility 506 categoryकरमणूक

कोल्हापूर:द फायर: डॉ.सुनिल पाटील:

शोले चित्रपटातील गाजलेली सूरमा भोपाली ची भूमिका केलेले कलाकार जगदीप काळाच्या पडद्या आड .फाळणीच्या आगेमागे झालेल्या दंग्यांमध्ये सर्वस्व गमावलेल्या कुटुंबातील जगदीप मुंबईस आला, तेव्हा तो सहा-सात वर्षांचा होता. त्याच्या आईने अनाथालयामध्ये काम करून त्याला लहानाचे मोठे केले. पडद्यावरचा हा विनोदी अभिनेता आईला कधीही विसरू शकला नाही. तिच्या आठवणीने सतत गहिवरणारा, पडद्यावरच्या प्रतिमेशी विपरीत असा जगदीप, वृत्तीने गंभीर होता. आईचे कष्ट बघून त्याने लहानपणीच स्वतः तिला सांगितले की, आई, मला काहीतरी काम करायचे आहे. मग तो सात- आठ वर्षांचा असल्यापासून टिनच्या कारखान्यात, तर कधी पतंग बनवण्याच्या व्यवसायात काम करू लागला.

बी आर चोपडा यांच्या 'अफसाना' त त्याला केवळ योगायोगाने काम मिळाले. एक मुलगा चांगले काम करत नव्हता, तेव्हा 'तू हे काम करशील का?' असे चोपडांनी त्याला विचारताच, तो 'हो' म्हणाला. त्यामुळे त्याचे दररोजचे मानधन दोन-तीन रुपयांवरून सहा रुपयांवर गेले! जगदीपने सिनेमात काम करण्यापूर्वी सिनेमाच बघितला नव्हता... पण तो बॉर्न ॲक्टर होता. देहबोलीचा आणि आवाजाच्या लवचिकतेचा वापर कसा करायचा, हे त्याच्याकडून शिकण्यासारखे होते. 'धोबी डॉक्टर' या चित्रपटात त्याने लहानपणीच्या किशोरकुमारचे काम केले होते. ते बघून बिमल रॉय यांनी त्याला 'दो बिघा जमीन' मध्ये घेतले. त्यामध्ये बूटपॉलिशवाल्याचे काम त्याने केले. 'धोबी डॉक्टर' मध्ये जगदीप सतत रडत असतो.  त्यात तो बालभूमिकेतच होता. 'दो बिघा...'मध्ये मात्र त्याची व्यक्तिरेखा विनोदी आहे. जगदीपने बिमलदांना विचारले की, माझा रडका रोल बघून तुम्ही मला यात हसरा रोल कसा दिला? तेव्हा ते उत्तरले की, जो खूप रडू शकतो, तो चांगल्या पद्धतीने हसवूही शकतो. बिमलदांमुळे माझ्या विचारांमध्ये खोली आली, असे जगदीप सांगायचा. 'दो बिघा..'त बूटपॉलिशवाल्या पोर्‍याचे करताना, एका बुटाला पॉलिश केल्यावर खूण करण्यासाठी 'टक टक' असा आवाज करण्याचा बारकावा जगदीपने त्यात आणला. तसेच 'रतन' मधील 'अंँखिया मिलाके' च्या चालीवर 'कलकत्ता मे आके पॉलिश ना करा के चले नहीं जाना' असे गाणे गुणगुणत तो लोकांना पॉलिश करून घ्यायचे आवाहन करत असतो. ही ॲडिशन त्याने स्वतःच्या बुद्धीने घेतली आणि बिमलदांना ती खूप आवडली.

 

गुरुदत्तच्या 'आरपार' मध्ये सुद्धा जगदीशने बालनट म्हणून समज दाखवली. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या 'मुन्ना' मध्ये त्याने छाप पाडली. बी आर चोपडा, अब्बास, बिमलदा, गुरुदत्त यांच्या छायेखाली बालपणापासून येण्याची संधी जगदीपला मिळाली. एकदा जगदीप सांगत होता की, गुरुदत्त, बिमल रॉय, शांताराम, मेहबूब खान, चोपडा हे सगळे केवळ निर्माता-दिग्दर्शक नव्हते, तर समाजाचे नेते होते. त्यांनी भारतीय समाजावर आधुनिक संस्कार केले, जे अनेक राजकीय नेते करू शकले नाहीत. जगदीपचे हे निरीक्षण मला वेगळे वाटते आणि महत्वाचे देखील. हे सारे दिग्दर्शक केवळ स्वतःचा विचार करत नव्हते. तर नवस्वतंत्र भारताचाही विचार करत होते. जगदीपसारख्या फारसे न शिकलेल्या माणसाला जीवनाचे बरेवाईट अनुभव घेऊन खूप चांगले शिक्षण मिळाले होते. हिंदू व मुसलमानांनी सलोख्याने एकत्र राहावे, अशीच त्याची मनापासूनची इच्छा होती. ती तो वारंवार बोलून दाखवत असे. एकदा तो म्हणाला की, काही लोक दुसऱ्याचे वाईट का चिंतितात तेच कळत नाही. असं करू नका, हे त्याचे कळकळीचे आवाहन होते. वागायला, बोलायला कमालीचा साधा आणि साध्या साध्या अनुभवाच्या गोष्टींमधून बरेच काही अर्थपूर्ण सांगणारा, असा हा जगदीप. आवाजाच्या माॅड्यूलेशनमधला बाप माणूस. जॉनी वॉकर, मेहमूद आणि जगदीप हे तिघेही ग्रेट कॉमेडियन्स. त्यांच्या अगोदरच्या पिढीतले नूर मोहम्मद चार्ली, मिर्झा मुशर्रफ, याकूब वगैरे. जगदीप अथवा बाकीचे हे नट कोणत्या धर्माचे होते याचा प्रेक्षकांनी कधी विचार केला नाही. मात्र मुस्लिम नटनट्यांनी देखील करोडो भारतीय लोकांचे जीवन काही काळ तरी सुसह्य बनवले होते, हे आजच्या वातावरणात आवर्जून सांगितले पाहिजे. जगदीपला आदरांजली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes