जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून तीन दिवस विविध उपक्रम
schedule07 Mar 20 person by visibility 306 categoryमहिला
कोल्हापूर (द फायर प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील अनेक संस्था-संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांत यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कसबा बावड्यात महिला पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सेवा रुग्णालयाच्या वतीने रविवारी (दि. ८) सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीतर्फे रविवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर टेंबे रोड येथील शेकापच्या कार्यालयात होणार आहे. शिबिरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया व तपासणी मोफत असून स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेकापने केले आहे. अंबाबाई महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता हॉटेल दामिनी येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.
बिनखांबी गणपती मंदिर परिसरातील मंगलधाम येथे ब्राह्मण सभेतर्फे 'ती आणि मी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आई, आजी, बहीण, सासू, मैत्रीण अशी नाती एकाच वेळी निभावणारी आजची स्त्री याविषयी संवाद होणार आहे. यावेळी अमृता दैनी, अनुजा तापस्कर, मनीषा आपटे यांच्या अभिवाचनातून हा संवाद साधण्यात येणार आहे. या कर्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. साई सर्व्हिसतर्फे 'चला घालू ताराराणी प्रदक्षिणा' हा उपक्रम सोमवारी (दि. ९) सकाळी ७ ते ८ या वेळेत घेण्यात येणार आहे. कोल्हापुरातील ताराराणी यांच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या स्थळांना भेटी देऊन माहिती घेण्यात येणार आहे.